आयुर्मान उलटूनही शहरातील रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या जुन्या वाहनांवर ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. यात गेल्या पाच महिन्यांत ५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात टॅक्सी, टेम्पो, ट्रक यांच्यासह खासगी चारचाकी वाहनांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.

मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे आयुर्मान आठ वर्षांसाठी ठरवून देण्यात आले आहे. मात्र अनेक चालक वाहनाचे आयुर्मान उलटून गेले असतानाही वाहन रस्त्यावर आणत असल्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यात जानेवारी ते ३१ मे या काळात सुमारे १६१ वाहनांची तपासणी करण्यात आली.

यात ५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आयुर्मान उलटलेल्या टॅक्सींचा सर्वाधिक समावेश आहे. अशा टॅक्सी रस्त्यावर आल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र सध्या सर्व प्रादेशिक परिवहन विभागात मनुष्यबळ कमी असल्याने अनेक आयुर्मान संपलेल्या गाडय़ा रस्त्यावर धावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात टॅक्सी चालक २ हजार रुपयांचा दंड भरून वाहन आरटीओतून सोडवून घेऊन जात असल्याने धोकादायक वाहनाचा प्रश्न अनुत्तरितच राहत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र यावर कठोर कारवाई केली जावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.