मीटर रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींवर रविवार, १६ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला असला तरी प्रत्यक्षात हा इशारा कागदावरच राहण्याची शक्यता आहे. २४ नोव्हेंबर नंतर कारवाई करण्याचा दिलेला इशारा कागदावर ठेऊन मीटर रिकॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळीही उच्च न्यायालयात राज्य शासनाने रिकॅलिब्रेशनच्या कामासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली असल्यामुळे परिवहन विभागाचा कारवाईचा इशारा पुन्हा एकदा कागदावरच राहणार हे स्पष्ट झाले आहे.
डॉ. हकीम समितीने केलेल्या शिफारशींनुसार ११ ऑक्टोबरला भाडेवाढ झाल्यावर २४ नोव्हेंबपर्यंत मीटर रिकॅलिब्रेशन करण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतर रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला होता. परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनीही २४ नोव्हेंबरनंतर रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींना नवे भाडे घेता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यानंतर रिकॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्यात आली. याकाळात केवळ ताडदेव आणि अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी काही रिक्षा-टॅक्सींवर कारवाई केली. या कारवाईला घाबरून रिक्षा-टॅक्सी चालक रिकॅलिब्रेशनसाठी येतील असे परिवहन अधिकाऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात या कारवाईचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे. वाढीव मुदत दिल्यानंतरही १५ दिवसांमध्ये रिकॅलिब्रेशनला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
परिवहन विभागाने दिलेली वाढीव मुदत शनिवारी संपली असून रविवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. उच्च न्यायालयाने रिकॅलिब्रेशनच्या कामातील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे परिवहन विभागाने आता कारवाईवर भर देण्याचे ठरविले आहे. प्रवाशांनीही रविवारपासून मीटर रिकॅलिब्रेट न झालेल्या रिक्षा-टॅक्सींचे क्रमांक मोटार वाहन विभागाच्या १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकावर कळवून तक्रार करावी, असे आवाहन परिवहन आयुक्तांनी केले आहे.
तसेच रिक्षा-टॅक्सी संघटनांनीही आपल्या सदस्यांना वाढीव मुदतीची वाट न पाहता कॅलिब्रेशन करून घेण्यास सांगावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.