वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयावर कारवाई

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषांचे पालन न करणाऱ्या तसेच अनेक कारणांसाठी वादग्रस्त राहिलेल्या शीव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश ‘एआयसीटीई’ने दिले आहेत.  महाविद्यालयात प्रथम वर्षांला व थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नजीकच्या अन्य महाविद्यालयात स्थलांतर करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.

महाविद्यालयातील पायाभूत सुविधा नसणे, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र नसणे, पुरेसा शिक्षकवर्ग नसणे अशा अनेक कारणांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश रद्द केले होते, तर मुंबई विद्यापीठानेही त्यांची प्रवेशक्षमता कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

उच्च न्यायालयातून एआयसीटीईच्या कारवाईला स्थगिती मिळाल्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली होती. ही प्रक्रिया राबविताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदारीवर प्रवेश घ्यावे अशी स्पष्ट सूचना न्यायालयाने केली होती. उच्च न्यायालयाच्या स्थगितीला एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठविण्याचे आदेश दिल्यानंतर ‘एआयसीटीई’ने प्रथम वर्ष व थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश संचालनालयाला दिले. त्यानुसार  विद्यार्थ्यांना अन्यत्र प्रवेश देण्याची कारवाई सुरू केली आहे.

सदर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने देऊनही वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी अद्यापि गुन्हा दाखल केलेला नाही. इमारत भाडेतत्त्वावर दाखवून भाडे स्वत:च घेणे, कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढणे आदीप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागामार्फत चौकशी करून संस्थाचालक व प्राचार्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांनी केली आहे.

तावडे गप्प का?

राज्यातील बहुतेक महाविद्यालयांचे प्राचार्य व संस्थाचालक एआयसीटीईला खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून शासनाची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करीत असताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हे हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून बसले आहेत. हजारो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना तावडे गप्प का बसून आहेत, असा सवाल मातेले यांनी केला आहे.