अभिनेता अजय देवगण याने ब्रिटिश व्हर्जिन आयलण्डमधील (बीव्हीआय) मेरिलिबॉन एण्टरटेनमेण्ट लि. या कंपनीचे सर्व समभाग २०१३ मध्ये खरेदी केल्याची बाब उघड झाली आहे. हिंदी चित्रपटाचे परदेशातील हक्क अबाधित राहावेत यासाठी समभाग घेण्यात आले असल्याचा दावाही देवगण याने केला आहे.
मोझॅक फॉन्सेका अ‍ॅण्ड कंपनी लि. ही मेरिलिबॉन कंपनीची नोंदणीकृत एजण्ट होती. बीव्हीआयमध्ये २९ ऑक्टोबर २०१३ रोजी नोंदलेल्या कंपनीचे मूळ समभागधारक लंडनस्थित हसन एन. सयानी हे होते. सयानी यांना ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी १००० समभाग देण्यात आले आणि त्याच दिवशी सयानी यांच्याकडून देवगण यांनी संपूर्ण समभाग विकत घेतले.
याबाबत अजय देवगण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, सदर कंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परदेशातील थेट गुंतवणूक मार्गाने स्थापन करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबीयांनी कायद्यानुसार आवश्यक असलेल्या कर परताव्यात तसे स्पष्टपणे नमूद केले आहे.या संदर्भात देवगण यांचे सनदी लेखापाल अनिल सेखरी म्हणाले की, देवगण यांच्याकडे मे. निसा युग एण्टरटेनमेण्टच्या वतीने १००० समभाग आहेत. अजय देवगण आणि काजोल देवगण यांची भागीदारीतील कंपनी आहे. ही कंपनी निसा युग एण्टरटेनमेण्टने थेट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून स्थापन केली असून रिझव्‍‌र्ह बँकेची सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.