ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री अमरापूरकर यांना मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमरापूरकर यांना फुफ्फुसांचा विकार झाल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं आहे. ६३ वर्षीय अमरापूरकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांत लक्षवेधी भूमिका केल्या असून ‘सडक’ या हिंदी चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर याची विशेष ओळख आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.