प्रतिकूल परिस्थितीमध्येही आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने बंड असते. कोणत्याही गोष्टीचा मनापासून ध्यास घेतला तर ती गोष्ट साध्य होतेच.. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या यशाचे गमक उलगडत होती. निमित्त होते लोकसत्ता व्हिवा लाउंजचे. मराठीमध्ये चित्रपटामध्ये ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ हे बिरुद मिरविणाऱ्या आणि त्याच वेळी समीक्षकांकडून अभिनयाची पोचपावतीही मिळवणाऱ्या सई ताम्हणकरबरोबर मनमोकळा संवाद दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात रंगला.
‘भूमिकेची गरज म्हणून एखाद्या अभिनेत्रीला कोणत्याही भूमिकेत शिरता आले पाहिजे. तसे तिला नऊवारी साडी ते बिकिनीपर्यंत कोणत्याही पोशाखाची भूमिकेची मागणी असेल तर वावरता यायला पाहिजे,’ असे स्पष्ट  करून ती म्हणाली, ‘अभिनयासोबतच आपल्या दिसण्याकडेही तितकेच लक्ष देण्याची आजच्या काळाची गरज आहे.’
केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम दिशा डायरेक्ट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. आपल्या कारकीर्दीचा प्रवास उलगडताना सईने प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचीही दिलखुलासपणे उत्तरे दिली. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचे श्रेय ती प्रखर इच्छाशक्तीला देते.
अभिनय क्षेत्रात यायचे कोणतेही बाळकडू नसताना महाविद्यालयीन स्पर्धेत तिने पारितोषिक पटकाविले. त्याच स्पर्धेदरम्यान तिला एका मालिकेसाठी विचारणा झाली आणि ती मुंबईत आली. अर्थात, मुंबईत आल्यावर या नगरीत संपूर्णपणे नव्या असलेल्या सईने येथे एकटे राहण्यापासून रात्री प्रवास करण्यापर्यंत सर्व गोष्टी शिकून घेतल्या. अर्थात हे करताना लहानपणापासून आईने तिला दिलेले कणखरपणा, स्पष्टवक्तेपणाचे धडे आणि कोणी त्रास दिलाच तर त्याला थोबाडीत देण्याची धमक आपल्या मदतीस आल्याचे ती सांगते.   प्रतिकूल परिस्थितीमध्येही आपले उद्दिष्ट  डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने बंड असते, असे सांगताना आतापर्यंतच्या आपल्या यशाचे गमकही तेच असल्याचे ती मान्य करते. तिने चित्रपटासाठी बिकिनी घातली होती, त्या वेळी तिच्या निर्णयाबद्दल कित्येकांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केली होती. त्या वेळी एक अभिनेत्री म्हणून आपली प्रत्येक कृती लोकांच्या नजरेत टिपली जाते ही अनुभूती आपल्याला तेव्हा आल्याचे सई सांगते. पण भूमिकेची गरज म्हणून अभिनेत्रीला नऊवारी साडी ते बिकिनीपर्यंत कोणताही पोशाख घालता आला पाहिजे, असेही ती सांगते. अभिनयासोबतच लूक्सवरही लक्ष देण्याची आजच्या काळाची गरज असल्याचे ती नमूद करते. त्यामुळेच ती अभिनयासोबतही आपण चांगले दिसू याकडे ती पुरेसे लक्ष देते. या मुलाखतीचे ८ मार्च रोजी झी २४ तास या वाहिनीवरून प्रक्षेपण होईल.