भाजपची कोंडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने सोमवारी मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभारावरून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले. विद्यापीठात पेपर तपासणीसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांसमोर विद्यापीठातील तक्रारींचा पाढा वाचला. पूर्ण तयारीअभावी ऑनलाईन पेपर तपासणीचा पर्याय का अवलंबण्यात आला? या सगळ्याची निविदा प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली होती? हा सगळा गोंधळ पाहता यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय उत्त्पन्न होत आहे. आतापर्यंत काही लाख उत्तरपत्रिकाच तपासून झाल्या आहेत. उर्वरित उत्तरपत्रिका ३१ तारखेपर्यंत तपासून होणे शक्य आहे का? उत्तरपत्रिका तपासून झाल्याच तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणे शक्य आहे का? निकाल न लागल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर इतर विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच या भोंगळ कारभाराची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री आणि कुलगुरूंनी राजीनामे द्यावेत, असे आदित्य यांनी म्हटले. 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लावण्यासाठी राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी दिलेली ३१ जुलैची मुदत संपण्यास सात-आठ दिवसच उरले असताना निकालासाठी विद्यापीठाची प्रचंड धावपळ सुरू आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तरी बेहत्तर, पण उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण करायचेच, असा जणू विडाच विद्यापीठाने उचलला असून, प्राध्यापकांना मूल्यांकनाचा एककलमी कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळे, आज, सोमवारपासून येत्या गुरुवापर्यंत चार दिवसांची ‘अध्ययन सुट्टी’ जाहीर करण्यात आली आहे. हे चार दिवस महाविद्यालयांमध्ये शिकवण्याचे कुठलेही काम होणार नाही.

उत्तरपत्रिकांच्या संगणकआधारित ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकनाबाबतच्या कुलगुरूंच्या दुराग्रही निर्णयाचा फटका प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनाही बसत आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत; तर प्राध्यापक मूल्यांकनात व्यग्र असल्यामुळे महाविद्यालय सुरू होऊनही अध्ययन होत नसल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय घेण्यास उशीर लावला आणि सर्व गोंधळ सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांनी याची दखल घेत विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करावेत, अशी तंबी दिली होती.

विद्यापीठात १८ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाते. दिलेल्या मुदतीत एवढय़ा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करायचे असेल तर दिवसाला ६० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीत विद्यापीठासाठी ती अशक्य कोटीतील बाब आहे. महाविद्यालये नियमित सुरू झाल्यामुळे प्राध्यापकांना सकाळचा वेळ महाविद्यालयात अध्ययन करून मग मूल्यांकनाचे काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत चार दिवस महाविद्यालयात न शिकविता उत्तरपत्रिका तपासण्याकरिता प्राध्यापकांना मुभा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्राचार्याना करत होते. मात्र त्याला फारसा कोणी प्रतिसाद न दिल्याने अखेर शनिवारी विद्यापीठानेच परिपत्रक काढून २४ ते २७ जुलै या कालावधीत ‘अध्ययन सुट्टी’ जाहीर केली.