शिवसेनेने गच्चीवरच्या हॉटेलचा प्रस्ताव मंजूर करण्याची संधी गमावली

मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर बोलण्याची संधी नाकारणाऱ्या महापौरांच्या निषेधाच्या घोषणा देत भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. भाजप, काँग्रेस नगरसेवकांच्या अनुपस्थितीत युवराज आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील गच्चीवरील हॉटेलच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची आयती संधी चालून आली होती. मात्र भाजप, काँग्रेसच्या सभात्यागामुळे भांबावलेल्या सत्ताधारी शिवसेनेला या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे सुचलेच नाही आणि आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्याची एक संधी शिवसेनेने वाया घालविली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

इमारतीच्या गच्चीवरील हॉटेलला परवानगी मिळावी यासाठी आदित्य ठाकरे गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. गच्चीवरील हॉटेलला परवानगी मिळावी यासाठी समाजवादी पार्टीचा सुरुवातीपासून शिवसेनेला पाठिंबा आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसचा या प्रस्तावाला कडाडून विरोध आहे. असे असतानाही पालिका सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून व्यक्त केला होता. त्यानंतर सोमवारी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या कामकाजाच्या कार्यक्रमपत्रिकेत गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मंजूर करण्याचे मोठे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यापुढे होते. महापौरांसह शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या गटनेत्यांबरोबर चर्चा करून या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनवणीही केली होती. मात्र भाजप आणि काँग्रेस नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.

मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांचा कचरा २ ऑक्टोबरपासून उचलण्यात येणार नाही या प्रशासनाच्या निर्णयावर सोमवारी पालिका सभागृहात चर्चा सुरू असताना महापौर बोलण्याची संधी देत नसल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप व काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला. मात्र ही संधी साधून शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर करता आला असता. कचऱ्यावरील चर्चा सुरू असताना प्रशासनाचा निषेध करीत सभागृह नेत्यांनी सभागृहाची बैठक तहकूब करण्याची मागणी केली. त्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांना बैठक तहकूब करावी लागली. बैठक तहकूब करण्याच्या मागणीऐवजी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊन वेळ मारून नेली असती तर महापौरांना गच्चीवरच्या हॉटेलचा प्रस्ताव मंजूर करण्याची संधी मिळाली असती. त्या वेळी भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात नव्हते आणि शिवसेनेचे संख्याबळ अधिक होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नातला प्रस्ताव सहज मंजूर होऊ शकला असता.