संपाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक आदी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सोमवारी सांगितले.
बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे व बसस्थानकावरून परीक्षा केंद्रांवर पोचविण्यासाठी बेस्टने पर्यायी व्यवस्था केली असून संरक्षण देण्यासाठी प्रत्येक बसमध्ये एक पोलिस कर्मचारी तैनात केला जाणार आहे.
संपाच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. डॉक्टर्स संपात सहभागी होणार नसल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होणार नाही. आवश्यकता वाटल्यास प्रशिक्षणार्थी परिचारिकांची मदत घेतली जाणार आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून विविध विभागांशी संपर्क ठेवला जाणार आहे व दर दोन तासांनी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. मध्य व पश्चिम रेल्वे आणि राज्य परिवहन मंडळानेही संप काळासाठी उपाययोजना केल्या आहेत. संप काळात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग, महिला आदींना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे बांठिया यांनी सांगितले.
खासगी वाहनांमधून आणि टेंपो, ट्रक आदी मालवाहू वाहनांमधूनही प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्याच्या सूचना शासनाने पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, स्वाधीन क्षत्रिय, डॉ.पी.एस.मीना, एस.के. शर्मा आदी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.