कंपनी बदलल्याने दिरंगाईने प्रवेश; विद्यार्थ्यांचा खोळंबा

एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालरखडपट्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे, तर दुसरीकडे सप्टेंबर महिना उजाडला तरी विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मात्र अद्याप सुरू झालेली नाही. विद्यापीठाकडून याबाबत ठोस उत्तर मिळत नसल्याने प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणारे लाखो विद्यार्थी मात्र जवळपास दोन महिन्यांपासून विद्यापीठामध्ये हेलपाटे घालत आहेत.

महाविद्यालयात जाऊन पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नसणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेचा मोठा आधार आहे. या संस्थेमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे मिळून सुमारे ३२ अभ्यासक्रम चालविले जातात. मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे लाखभर विद्यार्थी या संस्थेमध्ये दरवर्षी प्रवेश घेतात. सर्वसाधारणपणे या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू होते आणि सप्टेंबर महिन्यात संपुष्टातदेखील येते. परंतु यंदा जुलै महिन्यामध्ये प्रवेशाबाबत कोणतीही सूचना विद्यापीठाकडून न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी वाट पाहून विद्यापीठामध्ये चौकशीसाठी येरझाऱ्या घालणे सुरू केले आहे. यासंदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून मात्र त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही.

जवळपास दोन महिने प्रदीर्घ प्रतीक्षा करूनही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने आता काय करायचे अशी चिंता या विद्यार्थ्यांना लागली आहे.

ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणारी ही प्रवेश प्रक्रिया आत्तापर्यंत एक्झॉन कंपनीमार्फत केली जात होती. परंतु या वर्षी मात्र हे काम एक्झॉन कंपनीकडून काढून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) या कंपनीला देण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये एमकेसीएलची या कामासाठी नेमणूक करण्यात आली. नव्याने नेमण्यात आलेल्या एमकेसीएलला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी वेळ लागत असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांकडून समजले आहे. या संदर्भात दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेच्या संचालक अंबुजा साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

* दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे लाखो विद्यार्थी प्रवेशासाठी खोळंबले आहेत.

* एमकेसीएलला ऑनलाइन प्रवेशासाठीचे सॉफ्टवेअर बनविण्यासाठी बराच अवधी लागत आहे. तेव्हा आता एमकेसीएलकडून हे काम काढून पुन्हा जुन्याच कंपनीला देण्यात येण्याची शक्यता आहे.

* जुन्या कंपनीकडे ऑनलाइन प्रवेशाचे सॉफ्टवेअर तयार असल्याने तात्काळ प्रवेश प्रकिया सुरू करणे शक्य आहे. तेव्हा या बाबत सोमवारी अंतिम निर्णय होणार असून येत्या आठ दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.