शहरात कालानुरूप वाढत चाललेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी यंदा जाहिरातदारांनी बाजारातील मंदीमुळे पाठ फिरवली आहे. त्यामुळे असंख्य छोटय़ा मंडळांना खर्चाची आर्थिक गणिते जुळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येत्या नऊ दिवसांच्या खर्चासाठी तडजोड करावी लागणार असल्याने अनेक मंडळे परिसरात वर्गणी जमवण्यासाठी रात्रन्दिवस फिरत फेऱ्या मारत आहेत. तर काही मंडळांनी स्मरणिकांच्या माध्यमातून वर्गणी जमवण्याचा पर्याय अवलंबला आहे.
सध्या मुंबई व उपनगरात नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या छोटय़ा मंडळांची संख्या सुमारे दीड हजाराहून अधिक आहे. यातील छोटय़ात छोटय़ा मंडळांची नऊ दिवसांची आर्थिक उलाढाल पाच ते सात लाखांच्या घरात असते. देवीची मूर्ती, धार्मिक विधी, मंडप, सांस्कृतिक कार्यक्रम, डीजे, स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम आदींचा या खर्चात समावेश होतो. मात्र यंदा बाजारात मंदी असल्यामुळे अनेक उद्योजकांनी जाहिरात देताना हात आखडता घेतला आहे. परिणामी अनेक मंडळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. परंतु यंदा गणेशोत्सवात मंदी असतानाही अनेक उद्योजकांनी मंडळांना मोठय़ा प्रमाणात जाहिराती दिल्या. आता पाठोपाठ आलेल्या नवरात्रोत्सवात जाहिरात देताना उद्योजकांचा उत्साह कमी झाला आहे. जाहिराती न मिळाल्याने मंडळांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून मंडळे सध्या स्मरणिकांच्या माध्यमातून वर्गणी जमा करून खर्च भागवत असल्याचे विक्रोळीच्या स्वयंभू हनुमान बाळगोपाळ नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोडके यांनी सांगितले. यंदा जाहिरातींचा ओघ कमी आहे. त्यामुळे याचा मोठा फटका छोटय़ा मंडळांना बसला आहे. मात्र नवरात्र हा आपला पारंपरिक सण असल्याने खर्चात काटकसर करून उत्सव साजरा करणार असल्याचे मुंबईच्या फणसवाडी नवरात्रोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पेडणेकर यांनी सांगितले. तर बोरिवलीच्या भाग्यनगर सोसायटीचे रहिवासीही कमी खर्चात नवरात्रोत्सव साजरा करत असल्याचे हिरेन जोशी यांनी सांगितले.
यंदा बाजारात मंदी असल्याने ३२ सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडळांना वर्गणी दिली. दरवर्षी हाच आकडा ५२पर्यंत असतो. यंदा अनेक मंडळांना वर्गणी देऊ शकलो नसल्याने त्यांची निराशा झाली. मात्र अनेक उद्योजकांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने मंडळांना मोठय़ा प्रमाणात वर्गणी देणे अशक्य झाले असल्याचे प्रायोजक भूषण पाटील यांनी सांगितले.