करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटासंबंधीचा वाद मिटवून मनसेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करून दिला असला तरी त्यांच्या या वादाचा फायदा अजूनही अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’लाच होणार असल्याची चिन्हे आहेत. आधी ठरवल्याप्रमाणे एकपडदा चित्रपटगृह मालकांची संघटना ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह चार राज्यांमधील एकपडदा चित्रपटगृहांमध्ये निर्विवाद ‘शिवाय’चेच शो दिवसभर लागणार असल्याने अजय देवगणला जास्त फायदा होणार आहे.

सणांच्या दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर चित्रपटगृहांच्या संख्येवरून वादाची ठिणगी पडते. मात्र ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाला पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीच्या निर्णयाचा फटका बसला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह लागले. दरम्यानच्या या काळात एकपडदा चित्रपटगृह मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याने अजय देवगणला ‘शिवाय’साठी सर्वाधिक चित्रपटगृहे मिळणार होती. आता मनसेने ‘ऐ दिल है मुश्कील’च्या प्रदर्शनाला असलेला विरोध मागे घेतल्याने या चित्रपटाच्या प्रसिध्दी आणि वितरणाच्या कार्यक्रमाला वेग येईल. पण आम्ही अजूनही ‘ऐ दिल है मुश्कील’ हा चित्रपट प्रदर्शित करणार नाही आहोत, असे ‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिशन असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी स्पष्ट केले. ‘इम्पा’नंतर ही चित्रपटगृह मालकांची मोठी संघटना मानली जाते. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक एकपडदा चित्रपटगृहांमध्ये करण जोहरचा ५५ कोटी रुपये बजेट असलेला चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही. संघटनेच्या सदस्यांवर चित्रपट प्रदर्शन न करण्याची सक्ती नाही पण त्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर हा निर्णय घ्यायचा आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मल्टिप्लेक्सबरोबरच ‘शिवाय’ला मोठय़ा प्रमाणावर एकपडदा चित्रपटगृहे मिळतील आणि त्याला जास्त फायदा होईल.