ए दिल है मुश्कीलचित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध कायम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत भविष्यात सीमेपलीकडच्या कलाकार, तंत्रज्ञांबरोबर काम करणार नाही, पण ‘ए दिल है मुश्कील’साठी आपल्या साडेतीनशे भारतीय कलाकार, तंत्रज्ञांनी घाम गाळला आहे, चित्रपट प्रदर्शनास विरोध करून त्यांचे नुकसान करू नये, या दिग्दर्शक करण जोहरने केलेल्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावत मनसेने आपला विरोध कायम ठेवला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहासमोर निदर्शने करीत कोणत्याही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपट लावू नये, अन्यथा मनसे स्टाइल निदर्शनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

‘ए दिल है मुश्कील’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. ज्या वेळी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा दोन्ही देशांत मैत्रीचे संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न होत होते. आता दोन्ही देशांमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे त्यानंतर आपण पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणार नाही, असे करण जोहरने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.

मात्र करणच्या या निवेदनाला उशिरा सुचलेले शहाणपण असे नाव देत ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेने’चे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपट मल्टिप्लेक्समध्येही प्रदर्शित करू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बुधवारी सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो चित्रपटगृहांसमोर निदर्शने के ली. एकपडदा चित्रपटगृह मालकांनी ‘ए दिल है मुश्कील’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनीही हा चित्रपट दाखवू नये, असे आवाहनही मनसेने के ले. यामुळे या चित्रपटाचे भवितव्य अंधारात आहे.

  • मनसेकडून वारंवार धमक्या येत असल्याने दिग्दर्शक करण जोहर आणि ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’चे अधिकारी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
  • मनसेने आधी करण जोहरला मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित केला तर चित्रपटगृहांची मोडतोड करण्याची धमकी त्यांनी दिली असून चित्रपटगृहांना संरक्षण दिले जावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
  • या संदर्भात, जेव्हा गरज भासेल तेव्हा चित्रपटगृहांना मुंबई पोलिसांकडून संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी करण जोहर आणि निर्मात्यांना दिले आहे.
  • मल्टिप्लेक्स मालकांविरोधात आंदोलन केल्याने आझाद मैदान पोलिसांनी मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना  न्यायालयीन कोठडी सुनावली.