दादरच्या आगर बाजार परिसरात वडाचं मोठं झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत पावलेला व्यक्ती हा तेथे इडली विकण्याचा व्यवसाय करत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली. तर, जखमींमध्ये एक महिला आणि चहावाला जखमी झाला आहे. सदर व्यक्ती तब्बल अर्धातास उन्मळून पडलेल्या झाडाखालीचं अडकून पडल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना उपचारासाठी केईएमम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

फोटो गॅलरीः वडाचे झाड पडल्याने एकाचा मृत्यू

मुंबईत पुन्हा जोरदार पावसाची हजेरी; रेल्वेसेवा विस्कळीत 
मागच्या आठवड्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झालेला पहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई बरोबरच सर्व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील दादरच्या तीन नंबर फलाटाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक जवळपास दोन तास खोळंबली होती. ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम झाले असले तरी वाहतूक मात्र धीम्या गतीनेच सुरु आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.
मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून त्याचा परिणाम रस्त्यावरच्या वाहतुकीवर झालेला पहायला मिळत आहे. हिंदमाता, सायन, चेंबूर आणि सांताक्रूझ मिलन सबवेजवळ पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. गांधी मार्केट-माटुंगा, हिंदमाता परिसर जलमय झाला आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीपासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. भारतमाता, वांद्रे लिकिंग रोड, डॉ ऍनी बेझंट मार्गावरील वरळी पोलीस ठाण्याजवळ झाडे उन्मळून पडली.