मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी दुपारनंतर काहीसा ओसरला असून त्यामुळे शहरातील जीवन आता पूर्वपदावर येताना दिसत आहे. जोरदार पावसामुळे मंगळवारी सकाळी शहराची जीवनवाहिनी असणारी रेल्वेसेवा कोलमडली होती. मात्र, दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे आता मध्य आणि पश्चिम दोन्ही रेल्वेमार्गांवरील वाहतूक पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही दोन्ही मार्गावरील गाड्या उशीराने धावत आहेत.
गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे, कल्याण, आणि पालघरमध्ये जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असल्यामुळे तेथील जनजीवन ठप्प झाले होते. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सकाळपासूनच कोलमडली होती.
वांद्रे स्थानकात पाणी साठल्याने सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने चर्चगेटकडे येणाऱया लोकल सकाळी अंधेरी स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पालघरमध्येही मुसळधार पाऊस होत असल्याने मुंबई सेंट्रलहून गुजरात आणि इतर राज्यात जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. सायन स्थानकाजवळ पाणी साठल्याने मध्य रेल्वेच्या लोकलसेवेवरही पावसाचा परिणाम होता.
तर पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. अपुऱ्या प्रकाशामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
पालघर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद शाळांना मुसळधार पावसामुळे मंगळवारी सुटी जाहीर करण्यात आली.

तलाव परिसरातील सकाळी सहा वाजेपर्यंतचा पाऊस

मोडकसागर – १०९ मिमी
तानसा – १७६ मिमी
विहार – ५२ मिमी
तुलसी – ७५ मिमी
अप्पर वैतरणा – १०८ मिमी
भातसा – ११५ मिमी
मध्य वैतरणा – ११६ मिमी