आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) बरखास्त केल्यानंतर तीनच दिवसांनी पुन्हा एकदा भारतीय क्रीडाक्षेत्रावर शरमेची नामुष्की ओढवली आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या शक्यतेवरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघावर (आयएबीएफ) तात्पुरती बंदी घातली. केंद्र सरकारने क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय बॉक्सिंग महासंघ आणि भारतीय तिरंदाजी असोसिएशनची मान्यता रद्द केली आहे.
निवडणुकीत गैरप्रकार घडल्याच्या शक्यतेवरून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारतीय बॉक्सिंग महासंघावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाला भारतीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता रद्द करावी लागली आहे. सरकारच्या क्रीडा आचारसंहितेनुसार वय आणि कालमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने भारतीय तिरंदाजी असोसिएशनची मान्यताही रद्द केली आहे. अन्य क्रीडा संघटनाही आपल्या निवडणुकांमध्ये आयओएचा कित्ता गिरवत असल्याचे या घडामोडींवरून समोर आले आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने आयएबीएफवर तात्पुरती बंदी घालण्याचे ठरवले आहे. आयएबीएफच्या अलीकडे झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार घडल्याच्या शक्यतेवरून आम्ही हे पाऊल उचलले आहे. या निवडणुकीची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. आयओएचा अध्यक्ष आणि आयएबीएफची निवडणूक याचा परस्परसंबंध असल्याची शक्यता आहे,’’ असे एआयबीएच्या पत्रकात म्हटले आहे. आयएबीएफचे प्रतिनिधी म्हणून अभयसिंग चौटाला यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक लढवली आणि अध्यक्षपदी निवडून आले. विशेष म्हणजे, चौटाला यांचे साडू आणि राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिषेक मटोरिया हे आयएबीएफच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
या कारवाईनंतर क्रीडा मंत्रालयानेही आयएबीएफची मान्यता रद्द करून १५ दिवसांच्या आत फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘आयएबीएफची निवडणूक प्रक्रिया चुकीची असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी ठेवण्यात आला होता. उमेदवारी अर्ज कमी आल्यामुळे आयएबीएफच्या कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीतच नव्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे फेरनिवडणूक घेण्यासाठी आम्ही त्यांना १५ दिवसांचा कालावधी दिला आहे,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
‘‘निवडणुकीची जाहिरात न करणे, कार्यकारिणी समितीतील सदस्यांपर्यंत माहिती पोचवण्यात झालेली दिरंगाई, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिळालेला कमी कालावधी, संकेतस्थळावर योग्य माहिती न देणे अशा अनेक त्रुटी निवडणुकी प्रक्रियेदरम्यान जाणवल्या,’’ असेही जितेंद्र सिंग यांनी सांगितले. मात्र आपण फेरनिवडणुकीसाठी आणि अध्यक्षपदाचा त्याग करण्यासाठी तयार आहोत, असे चौटाला यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘भारतीय तिरंदाजी असोसिएशनची निवडणूक नऊ नोव्हेंबरला पार पडली. पण या निवडणुकीत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. विजय कुमार मल्होत्रा हे तीनपेक्षा जास्त वेळा अध्यक्षपदी निवडून आले असून ते सध्या ७० वर्षांचे आहेत. क्रीडा मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणूक न झाल्यास, कोणत्याही संघटनेला मान्यता देऊ नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळेच आम्ही तिरंदाजी असोसिएशनची मान्यता रद्द केली,’’ असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. भाजपचे नेते विजय कुमार हे सलग दहाव्यांदा अध्यक्षपदी निवडून आले असून, ते ४०पेक्षा जास्त वर्षे भारतीय तिरंदाजी असोसिएशनवर आहेत.     

  ‘‘भारतीय बॉक्सिंगसाठी हा वाईट दिवस आहे. ही घटना घडेल, असे मला कधीही वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेला निवडणुकीसंदर्भातली माहिती का सांगण्यात आली नाही, हेच मला कळत नाही. मात्र हे प्रकरण लवकरच मिटेल, अशी खात्री आहे.’’
– बॉक्सर विजेंदर सिंग