मुंबई शहरातील पाच नाके तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी समितीकडून आढावा घेण्याच्या शासनाच्या योजनेचा भाग म्हणून या टोल नाक्यांवरून दररोज किती वाहने ये-जा करतात याची पुन्हा नव्याने मोजणी करण्यात येणार आहे. यावरून ठेकेदाराच्या दाव्यात किती तथ्य आहे याचा अंदाज येऊ शकेल.
राज्यातील ५० टोलनाक्यांवर १ जूनपासून पूर्ण किंवा छोटय़ा वाहनांना टोलबंदी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच मुंबई व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलबंदीचा निर्णय ३१ जुलैपर्यंत घेतला जाणार आहे. या दोन्ही शहरांतील टोलच्या संदर्भात तज्ज्ञ समितीकडून आढावा घेतला जाणार आहे. यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. गेल्याच आठवडय़ात समिती स्थापन करण्याचा आदेश जारी करण्यात आला. समितीने कामाला सुरुवात केली असून, मुंबईतील पाच टोल नाके तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या करारपत्रांचा आढावा तसेच अन्य प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
करारात नेमकी तरतूद कोणती आहे हे तपासण्यात येणार आहे. तसेच छोटय़ा वाहनांवरील टोल बंद करायचा झाल्यास मुंबईतील पाच टोल नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावर दररोज नक्की किती वाहनांची ये-जा करण्यात येते, याची आकडेवारी नव्याने जमा केली जाणार आहे. टोल ठेकेदाराकडून सादर करण्यात आलेली वाहनांची आकडेवारी व प्रत्यक्ष वाहनांची आकडेवारी यात बऱ्याच प्रमाणात फरक असल्याचे शासनाला आढळून आले आहे. सूत्राच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराकडून करण्यात येणारा दावा व प्रत्यक्ष वाहनांची संख्या यात तिप्पट तफावत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाहनांच्या नक्की आकडेवारीची माहिती मागविली आहे.  टोल नाक्यांवरून दररोज किती वाहनांनी ये-जा होते या आकडेवारीचा अंदाज आल्यावरच टोलबंदीचा निर्णय घेण्याकरिता ही आकडेवारी फायदेशीर ठरेल.  
जुलैमध्ये अहवाल
टोलबंदीचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील पाच टोल नाके तसेच पुणे द्रुतगती मार्गावर नक्की किती वाहनांची ये-जा होते याची ताजी आकडेवारी जमविण्यात येणार आहे. यानुसार या सर्व टोल नाक्यांवर वाहनांची अत्याधुनिक पद्धतीने मोजणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांनी दिली. समिती अहवाल जुलैत  शासनाला सादर करणार आहे.