तेंडुलकरच्या घरासमोर उपोषणाचा प्रयत्न

माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याने जाहिरात केलेल्या गृहनिर्माण संस्थेने आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार करत सचिनच्या घरासमोर उपोषणास बसलेल्या एका व्यक्तीस वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या काळात आपण या संस्थेला आपली जमीन विकली, त्या काळात सचिन तेंडुलकर या कंपनीचा सदिच्छादूत होता, असा आरोप या उपोषणकर्त्यांने केला आहे. वांद्रे पोलिसांनी या व्यक्तीसह तीन जणांना अटक केली, तसेच तक्रारीचे पत्रक तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासनही उपोषणकर्त्यांला दिले.

पुणे येथील रहिवासी असलेले संदीप कुऱ्हाडे यांच्या आई आणि मामाच्या मालकीची आंबेगाव, बुद्रुक पुणे येथे १४ गुंठे जमीन आहे. सन २०१० मध्ये ही जमीन एका गृहनिर्माण संस्थेला विकण्यात आली. मात्र, या जमिनीचा आपल्याला पुरेसा मोबदला न देता ती बळजबरी आपल्या ताब्यातून घेण्यात आली, असा आरोप कुऱ्हाडे यांनी केला आहे. त्यांनी पुणे पोलिसांत याप्रकरणी तक्रारही केली होती. मात्र, गृहनिर्माण संस्थेने कागदपत्रे सादर केल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण मिटवले. परंतु, आपल्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याचा कुऱ्हाडे यांचा आरोप कायम आहे.

सन २०१० ते २०१४ दरम्यान सचिन संस्थेचे सदिच्छादूत होते, त्याचदरम्यान माझ्या जमिनीचा व्यवहार झाला असून मला न्याय मिळवून देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असा दावा करत कुऱ्हाडे यांनी थेट सचिनच्या घरासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला.  मात्र वांद्रे पोलिसांनी अशा प्रकारे उपोषण करता येणार नाही, असे कुऱ्हाडे यांना सांगितले.  तरीही बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडे, श्रीजीत रमेशन आणि संतोष कुमार यांनी तेंडुलकर यांच्या पेरी क्रॉस येथील घरासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली.  त्यांना न्यायालयात हजर केले असता, पुन्हा आंदोलन न करण्याची हमी दिल्यानंतर वैयक्तिक जामिनावर सोडून देण्यात आले.