शुक्रवारी दिल्लीत कुलगुरूंची बैठक

कृषी अनुसंधान परिषदेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार सुरू झाला असून, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्ली येथे येत्या शुक्रवारी (दि. १५) कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे साईबाबांचे दर्शन कृषी विद्यापीठासाठी फायद्याचे ठरले आहे. शिर्डी येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी विद्यापीठाला धावती भेट दिली. त्या वेळी अधिस्वीकृतीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत नोकरभरती बंद होती. त्यामुळे संचालकांच्या १२ जागांपैकी केवळ एकच संचालकांची जागा भरली आहे. साडेबारा हजार पदे रिक्त आहेत. मजुरांपासून ते कृषिशास्त्रज्ञांपर्यंतच्या जागा सुमारे आठ वर्षांत भरल्याच गेल्या नाहीत. त्यातच १५५ कृषी महाविद्यालये सुरू करण्यात आले. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कृषी शिक्षणाचा दर्जा खालावला. त्यामुळे अधिस्वीकृती समितीने मान्यता स्थगित केली होती. राज्यातील विद्यापीठांना सुमारे ५० कोटींचा फटका बसला होता. आता या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे.