आठव्या भारतीय युवा परिषदेची शिफारस

देशातील कृषी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची नव्हे, तर सदाहरित क्रांतीची गरज असल्याची शिफारस आठव्या भारतीय युवा परिषदेनंतर सरकारदरबारी करण्यात येणार आहे. याचबरोबर अन्य काही महत्त्वपूर्ण शिफारसी या परिषदेच्या माध्यमातून स्वामिनाथ संशोधन संस्थेच्या वतीने केंद्र सरकारला कळविल्या जाणार आहेत.

देशाच्या अन्नसुरक्षेला आर्थिक, पर्यावरणीय आणि समाजातील विविध घटकांपासून धोका जाणवत असून दक्षता बाळगून देशाच्या अन्नसुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. देशाचे कृषिक्षेत्र अनेक संकटातून जात असून त्यामध्ये शेतीयोग्य क्षेत्र, शेतीक्षेत्राकडे तरुण पिढीची उदासीनता, सार्वजनिक धोरणाची असहायता, सार्वजनिक वितरण प्रणाली अशा विविध संकटाने कृषिक्षेत्राला ग्रासले असून त्यावर वेळीच तोडगा काढणे काळाची गरज असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. ते आज आठव्या भारतीय युवा परिषदेच्या समारोप समारंभात बोलत होते. सर्वसामान्य माणसाला अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि सकष व पोषक आहारासाठी झगडावे लागत आहे. देशाच्या अनेक कोपऱ्यात कुपोषणाचे प्रमाण आधिक्याने जाणवत आहे आणि हे खेदजनक आहे. त्याचप्रमाणे हवामान बदलाचाही दुष्परिणाम कृषिक्षेत्रावर जाणवत असून त्यामुळेही शेतीउद्योग संकटात सापडले आहे. या सर्वावर यशस्वी मात करण्यासाठी देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज नसून सदाहरित क्रांतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय कृषी आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या अहवालामध्ये या शिफारशी नमूद करण्यात आल्या असून या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या भारतीय युवा विज्ञान परिषदेचा शनिवारी समारोप समारंभ पार पडला. तीन दिवसीय या परिषदेत देशभरातील १५००हून अधिक तरुण संशोधक सहभागी झाले होते. या परिषदेत विविध क्षेत्रातील वैज्ञानिकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भित्तीपत्रक स्पर्धा आणि मौखिक सादरीकरणातून अनेक तरुण संशोधकानी आणि नवउद्योजकांनी मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान या अशा अनेक विषयांवर सादरीकरण केले. समारोप समारंभामध्ये ज्याने तरुण वयात पहिला थ्री-डी िपट्रर बनवून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवली तो करण चाफेकर आणि आयआयटी मुंबईतील प्रथम या विद्यार्थी उपग्रहाच्या चमूतील विद्यार्थी आदित्य सिंघल उपस्थित होता. तीन दिवसीय या युवा विज्ञान परिषदेच्या समारोप समारंभामध्ये विविध विषयांमध्ये प्रयोग सादर करणाऱ्या सवरेत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.