रेल्वे महाव्यवस्थापकांच्या मते कागदपत्रे रेल्वे सुरक्षा आयुक्तांना सादर; मुंबईकरांचा उकाडय़ातच प्रवास

विविध प्रकल्पांसाठी रेल्वेने केलेले मुदतीचे वायदे मोडण्याची प्रथा मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या चाचणीच्या बाबतीतही कायम ठेवली आहे. या गाडीची चाचणी मे महिन्याच्या दाहक उकाडय़ात घेतली जाईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक छातीठोकपणे सांगत असले, तरी तशी सुतराम शक्यता दिसत नाही. ही चाचणी घेण्यासाठी मध्य रेल्वेला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पत्र पाठवण्याची गरज आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार ही कागदपत्रे रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहेत, मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अद्यापही कागदपत्रे न मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

रेल्वे मार्गावर येणाऱ्या कोणत्याही नवीन प्रकारच्या गाडीची चाचणी होणे अत्यावश्यक असते. त्यानुसार वातानुकूलित लोकल गाडीची चाचणी होणार आहे. ही चाचणी मे महिन्यातच घेतली जावी, यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद आग्रही होते. त्यानुसार ५ एप्रिल रोजी ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्यानंतर कामेही सुरू झाली. मात्र अद्याप या गाडीतील विद्युत यंत्रणा आणि सॉफ्टवेअर यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या गाडीची मोजमापे नियोजित मोजमापांपेक्षा जास्त असल्याने त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून परवानगी लागणार आहे.

मध्य रेल्वेतील काही सूत्रांनुसार वातानुकूलित लोकलच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना डावलून थेट मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे ही कागदपत्रे पाठवण्यात आल्याची माहिती समजते. पण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार ही कागदपत्रे रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत.

परवानगी कशी मिळते?

परवानगीसाठी मध्य रेल्वेला सर्वात आधी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे या गाडीचा अहवाल पाठवावा लागतो. रेल्वे सुरक्षा आयुक्त या अहवालाची पाहणी करून तो मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे लखनऊ येथे पाठवतात. तेथेही या अहवालाची पडताळणी होऊन मग तो रेल्वे बोर्डाकडे जातो. रेल्वे सुरक्षा आयुक्त किंवा मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या अहवालातील काही बाबींवर प्रश्नचिन्ह किंवा शंका उपस्थित केल्यास त्याचा खुलासा रेल्वेला करावा लागतो.

अहवालात कोणतीही अडचण नसेल, तर रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळण्यास कामाचे १५ दिवस किमान लागतात. मात्र अहवालात काही शंका असल्यास हा कालावधी वाढू शकतो.

मध्य रेल्वेने वातानुकूलित गाडीच्या चाचणीसाठी परवानगी घेण्यास सर्व कागदपत्रे रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर केली आहेत. निर्णय झाल्यास मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात वातानुकूलित लोकलची चाचणी सुरू होईल.

– ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद,  महाव्यवस्थापक (मध्य रेल्वे)

वातानुकूलित गाडीच्या चाचणीसाठीची कोणतीही कागदपत्रे मध्य रेल्वेकडून मिळालेली नाहीत. ही कागदपत्रे हाती आल्यानंतर त्यांचा अभ्यास करून मगच ती पुढे मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे पाठवली जातील.

– सुशील चंद्र,   रेल्वे सुरक्षा आयुक्त (प्रभारी) मध्य रेल्वे.