एकेकाळी आपल्या उत्तम सेवेसाठी ओळखली जाणारी एअर इंडिया विमान कंपनी सध्या दिरंगाईने उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी बदनाम होत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शनिवारी रात्री नेवार्ककडे उड्डाण करणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची सबब पुढे करून प्रवाशांना पाच तास विमानातच बसवून ठेवण्याचा ‘पराक्रम’ एअर इंडियाने केल्यानंतर रविवारी लंडनला जाणारे विमानही दोन तास उशिरानेच उडाले. एअर इंडियाच्या या अत्यंत वाईट सेवेमुळे प्रवासी मात्र जेरीस आले आहेत.
मुंबईहून नेवार्कला जाणारे एआय-१९१ हे विमान शनिवारी उड्डाणासाठी तयार झाले. १९१ प्रवासी विमानात बसले आणि काही वेळातच विमानात छोटासा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र चार तास उलटले तरी विमान एकाच ठिकाणी उभे असल्याने प्रवासी हैराण झाले. दरम्यान, कामाचे तास संपल्याने प्रवाशांना कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांनीही विमानातून काढता पाय घेतल्याचे एका प्रवाशाने सांगितले. गोंधळलेले प्रवासी आपल्याजवळील सामान घेऊन विमानतळावरआल्यानंतर एअर इंडियाच्या कक्षातही कर्मचारी नव्हते. तसेच आमचे सामान सरकत्या पट्टय़ांच्या बाजूला ठेवण्यात आले होते, असेही काही प्रवाशांनी सांगितले. याबाबत खुलासा करताना एअर इंडियाने तांत्रिक बिघाड झाल्याचे मान्य केले. हा बिघाड दुरुस्त झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ संपल्याने या विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही, असा खुलासा एअर इंडियाने केला. तसेच या विमानातील १९१ पैकी ४४ प्रवाशांची सोय विमानतळाजवळील हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मुंबईच्या प्रवाशांना टॅक्सीभाडे देण्यात आले. तर, काही प्रवाशांना दिल्लीला पाठवून तेथून त्यांच्या पुढील प्रवासाची सोय करण्यात आली होती.