युती-आघाडी तुटल्या-फुटल्यामुळे प्रत्येक मतदारसंघात होणारी चौरंगी-पंचरंगी लढत.. प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा.. त्यातच प्रचाराला उरलेला वेळ कमी आणि प्रचारसभा जास्त.. या सर्व पाश्र्वभूमीवर झंझावाती प्रचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी छोटेखानी विमाने-हेलिकॉप्टर यांचा आसरा घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या अवकाशात ३६ ते ४० छोटी विमाने व हेलिकॉप्टर प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी थेट विमाने-हेलिकॉप्टरांचे आरक्षणच करून ठेवले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत युती-आघाडी अभेद्य राहिल्यामुळे राज्याच्या अवकाशात २२ ते २५ विमाने व हेलिकॉप्टरनी घिरटय़ा घातल्या होत्या. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी आहे. त्यामुळेच भाडेतत्त्वावरील विमान-हेलिकॉप्टरची मागणी वाढली असून ही संख्या ३६ ते ४०च्या दरम्यान असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि काही हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार सांगतात. राज्यात स्वबळावर सत्ता स्थापण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपने दहा हेलिकॉप्टर व विमानांचे आरक्षण केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक छोटे विमान व दोन हेलिकॉप्टर प्रचारासाठी दिमतीला ठेवले असल्याचे पक्षाचे सरचिटणीस प्रकाश बिनसाळे यांनी सांगितले. प्रचाराच्या या हवाई झंझावातात काँग्रेसही अग्रणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रतितास दीड लाख रुपये  
प्रचारादरम्यान वापरली जाणारी लहान विमाने किंवा हेलिकॉप्टर यांचे भाडे प्रतितासाप्रमाणे आकारले जाते. हे भाडे साधारण ८५ हजार रुपये ते दीड लाख रुपये यादरम्यान आहे. लहान विमानांना दोनशे किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तसेच विमान प्रवासात नेत्यांचे मोबाइल फोन बंद असल्याने आणि कार्यकर्त्यांचा गराडा नसल्याने नेत्यांना स्वत:चा वेळ मिळतो. या वेळेत अनेकदा पुढील सभेची तयारी करण्यातच नेतेमंडळी व्यग्र असतात.
दोन लांबची ठिकाणे गाठण्यासाठी नेते लहान विमानांचा वापर करतात. मात्र एका प्रमुख ठिकाणाहून आसपासच्या जिल्ह्य़ांतील सभांना जायचे असल्यास हेलिकॉप्टरचा वापर होतो. यंदा खूप कमी दिवसांत जास्तीत जास्त ठिकाणी नेत्यांना पोहोचायचे आहे. अशा वेळी राजकीय पक्षांच्या गरजेनुसार आम्हाला सेवा द्यावी लागते. त्यासाठीचे नियोजन करणे ही आमच्यासमोरील कसोटी आहे.
– मंदार भारदे, मॅब एव्हिएशन