नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतेला आतापर्यंत विमानतळाला भेट देऊन आलेल्यांपैकी सर्वानीच नावाजले आहे. मात्र मंगळवारी संध्याकाळपासून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानतळाच्या स्वच्छतेची पार ‘ऐशीतैशी’ झाली होती. या दोन्ही विमानतळांवरील सफाई कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या साफसफाईपासून इतर स्वच्छतेचाही पूर्ण बोजवारा उडाला. अखेर बुधवारी दुपारी या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत पुन्हा झाडू हाती घेतले. परदेशी लोकांसमोर स्वच्छ भारताचे चित्र उभे करणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वच्छता आणि साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त ८५०० रुपये एवढे वेतन दिले जाते. एवढय़ा तुटपुंज्या पगारात खर्च भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बहुजन राष्ट्रीय सेना या संघटनेने मंगळवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून काम बंद आंदोलन पुकारले होते. या संघटनेचे तब्बल दीड हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने काही वेळातच स्वच्छतेची दैना उडाली होती. सफाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीबाबत शुक्रवारी चर्चा करण्याचे आश्वासन विमानतळ प्राधिकरणाने दिल्यानंतर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र तोपर्यंत आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानतळांवरील स्वच्छतागृहांची सफाईदेखील झाली नसल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.