२९ मे रोजी अंकाचे प्रकाशन; इतिहासापासून ते जगभरातल्या संस्कृतीमधील ‘विषय विचारांची’ मांडणी
छापील माध्यमांचे प्रभावक्षेत्र मान्य करूनही सध्या डिजिटल माध्यमातून मराठी लेखन प्रकाशित करण्याचा पायंडाही पडू लागला आहे. ‘ऐसी अक्षरे.कॉम’ या संकेतस्थळाने गेल्या वर्षांपासून विशिष्ट संकल्पनेवर मे विशेषांक प्रकाशित करण्याची सुरुवात केली आहे. ‘ऐसी अक्षरे’च्या मे विशेषांकातून ‘पोर्न’ संकल्पनेचा धांडोळा घेण्यात आला असून येत्या २९ मे रोजी त्याचे प्रकाशन होणार आहे.
‘ऐसी अक्षरे’ हे मराठी भाषेत लिहिणाऱ्यांचे संवादस्थळ २०१२ मध्ये सुरू झाले. डिजिटल माध्यमातील मराठी वाचकांमध्ये विषयांचे वैविध्य, अभ्यासू लेखनामुळे हे संकेतस्थळ लोकप्रिय आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात भा. रा. भागवत यांच्यावरील ‘भारा’वलेले’ या विशेषांकाने ‘मे विशेषांक’ उपक्रमाची सुरुवात झाली. ‘पॉर्न’ संकल्पनेचा इतिहास, जगभरच्या संस्कृतींमधील त्याचे स्थान या संकल्पनेला चिकटलेले सामाजिक सभ्यासभ्यतेचे संकेत, त्यातून होणारे शोषण, गुन्हेगारी तसेच त्याच्यामागचे राजकारण-अर्थकारण आदी अनेक अंगांनी या संकल्पनेचा विचार करणारे लेखन अंकात आहे. कथा, कविता, मुलाखती, जुन्या ग्रंथांतील लेखन तसेच चर्चात्मक आणि ललित लेख अशा विविध शैली व स्वरूपाच्या लेखनातून ‘पोर्न’ या संकल्पनेचा वेध घेतला जाणार
आहे.
सुबोध जावडेकर, आनंद करंदीकर, धर्मकिर्ती सुमंत आदींचे चर्चात्मक लेख, सतीश तांबे, प्रणव सखदेव, पंकज भोसले आदी लेखकांच्या कथा तसेच सावित्री मेधातुल, भूषण कोरगावकर, कविता महाजन यांच्या मुलाखतीही वाचायला मिळणार आहेत.
याशिवाय र. धों. कर्वे, वि. का. राजवाडे, रॉय किणीकर आदींच्या साहित्यातील या विषयासंदर्भातले लेखनही या विशेषांकात वाचायला मिळणार आहे.

‘पोर्न’ या विषयाबद्दल निरनिराळ्या माध्यमांमध्ये व निरनिराळ्या काळांत उपलब्ध असलेले शृंगारसाहित्य, त्याचे समाजाशी असलेले दुपदरी नाते, त्यावर घालण्यात आलेली बंदी, त्यातून होणारे शोषण आणि त्याची अपरिहार्यता असा या अंकाचा रोख असणार आहे. येत्या २९ मेपासून सुरुवात करून पुढचा आठवडाभर ५ जूनपर्यंत ‘ऐसी अक्षरे’च्या संस्थळावर अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
– मेघना भुस्कुटे,
संपादक मंडळ सदस्य, ‘ऐसी अक्षरे.कॉम’ संकेतस्थळ