अधिवेशनात विरोधकांचे अस्तित्व तरी जाणवले

पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार या माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या जोडीला विधानसभेत सापडलेला सूर आणि विरोधकांचे अस्तित्व प्रथमच जाणवल्याने पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ात सत्ताधाऱ्यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. विरोधकांचा एवढा जोर पहिल्यांदाच बघायला मिळाला.

सत्ता गेल्यापासून अजित पवार हे फारसे आक्रमक नसायचे. सुरुवातीच्या काही अधिवेशनांमध्ये ते फक्त हजेरी लावण्यापुरतेच सभागृहात येत असत. गेल्या दोन-तीन अधिवेशनांपासून अजितदादा आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनात तर अजितदादांचा वेगळाच सूर बघायला मिळाला. दररोज प्रत्येक मुद्दय़ावर पवार आक्रमक भूमिका घेतात. सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यात अजितदादांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या टांगत्या तलवारीमुळेच बहुधा अजितदादांनी सुरुवातीला थोडे नमते घेतले होते. पण आता मात्र अजितदादा विरोधी पक्षनेत्याची भूमिका वठविताना दिसतात. सुनील तटकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक असतात, पण अजितदादांनी घेतलेल्या पुढाकारामुळे साहजिकच सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांच्या भुवया साहजिकच उंचावल्या आहेत.

काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे किल्ला लढवितात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तूरडाळ घोटाळा किंवा अन्य महत्त्वाचे प्रश्न आतापर्यंत मांडले आहेत. पण गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची कोंडी करण्यात पृथ्वीराजबाबांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय’ हा शेरा मेहता यांनी फाइलवर लिहिला होता. त्याचा अर्थ काय व त्याला मुख्यमंत्र्यांची अनुमती होती का, असा थेट प्रश्नच चव्हाण यांनी मेहता यांना केला होता. मुख्यमंत्र्यांनी हात वर केल्याने मेहता त्यात अडकले.

मुख्यमंत्रिपदी असताना पृथ्वीराजबाबांनी स्वपक्षीय आमदारांची नाराजी ओढावून घेतली होती. सत्ता गेल्यावर तर पक्षाचे आमदार चव्हाण यांना फार काही महत्त्व देत नाहीत. त्यातूनच काँग्रेसच्या बाकावर चव्हाण एकाकी पडतात. स्वपक्षीय आमदारांची साथ नाही, राष्ट्रवादी तर दु:स्वास करीत असतानाही काँग्रेसची बाजू पृथ्वीराजबाबा लावून धरतात. राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी डोळे वटारल्यावर सारे आमदार एकत्र येतात. काँग्रेसमध्ये तर कोणाचा पायपूस कोणात नाही, अशी परिस्थिती आहे. विखे-पाटील यांना ज्येष्ठ नेते विचारत नाहीत तर अन्य आमदारांचे वेगळेच सुरू असते. त्यातून प्रमुख विरोधी पक्ष असूनही काँग्रेसचा सभागृहात तेवढा प्रभाव पडत नाही.

वादग्रस्त ध्वनिफीत प्रकरण रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची झालेली हकालपट्टी आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीची झालेली घोषणा यामुळे विरोधकांचे अस्तित्व अधिवेशनात प्रथम जाणवले.