सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करीत असलेल्या ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे हे पुन्हा अनुपस्थित राहिले. अखेर त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करून आणखी एक संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही ते अनुपस्थित राहिले तर अनुत्तरित प्रश्नांसह अहवाल महासंचालकांना सादर केला जाणार आहे. महासंचालकांच्या आदेशानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोकण पाटबंधारे मंडळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ठाणे एसीबीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीअंतर्गत येणाऱ्या रायगड येथील बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करून पाटबंधारे विभागातील अभियंत्यांसह संबंधित कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. या अनुषंगाने चौकशीसाठी तटकरे आणि पवार यांना गेल्या आठवडय़ात बोलाविण्यात आले होते. हे दोन्ही नेते स्वत: उपस्थित न होता त्यांचे प्रतिनिधी हजर होते. परंतु या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तटकरे यांना सोमवारी तर पवार यांना मंगळवारी हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते.