अजित पवार यांचा काँग्रेसला सल्ला

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पाच तर काँग्रेस दोन, असेच जागावाटप झाले पाहिजे. काँग्रेसला हे सूत्र मान्य नसल्यास भविष्यात आघाडी करताना हा मुद्दा आड येणारच, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही सांगतो तसेच ऐका, असा सल्ला काँग्रेसला दिला.

विधान परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जावा, असे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. १९९९ पासून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत ज्याकडे जागा आहे त्यांना जागा सोडण्यात यावी, असे सूत्र निश्चित झाले आहे. यानुसार यवतमाळ, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, पुणे हे स्थानिक प्राधिकारी तसेच औरंगाबाद शिक्षक हे पाच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर नांदेड स्थानिक प्राधिकारी व नाशिक पदवीधर हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत असे अपेक्षित आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे संख्याबळ जास्त असले तरी ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याचा मुद्दा तटकरे यांनी मांडला. अजित पवार यांनी मात्र आघाडी करताना आमचे ऐका, असेच काँग्रेसला सुनावले.

राष्ट्रवादीच्या पराभवाला प्रफुल्ल पटेल आणि आपण काँग्रेसला जबाबदार धरले आणि आता पुन्हा काँग्रेसशी आघाडी कशी करता या प्रश्नावर अजित पवार यांनी तेव्हाची, परिस्थिती आणि विद्यमान परिस्थिती वेगळी असल्याचे सांगितले. काँग्रेसमुळेच तेव्हा आघाडी होऊ शकली नव्हती. भाजप-शिवसेनेला रोखायचे असल्यास आघाडी करणे अपरिहार्य आहे. जागावाटप जुन्या सूत्रानुसार झाले पाहिजे, अन्यथा काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये ‘मी’ उमेदवार उभे करीन, असा इशाराही पवार यांनी दिला.