अजित पवार यांची टीका

भ्रष्ट मंत्र्यांच्या मुद्दय़ावरून भाजप सरकारला गेले काही दिवस घेरणाऱ्या विरोधी पक्षाने महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकार सपशेल नापास झाल्याचे सांगत गुरुवारी विधानसभेत घणाघाती हल्ला चढवला. मेक इन इंडियाचे स्वप्न दाखवत राज्यात काही लाख कोटींचे उद्योग येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. ना उद्योग आले ना तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. यांची जाहिरातबाजीच फक्त मोठी, महागाईने गृहिणींचे कंबरडे मोडले असून ‘आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र’असा जळजळीत सवाल राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपस्थित केला.

राज्यात बेरोजगारी वाढत आहे. सेवायोजना कार्यालयात ३८ लाख बेरोजगारांची नोंद आहे. या तरुणांना काम देण्यासाठी राज्यात उद्योग सक्षम नाही. नवीन उद्योग येणे तर सोडाच पण आहेत ते उद्योग वीजदरवाढीमुळे अन्य राज्यांत जात आहेत, असे सांगत पोलीस भरतीसाठी एमबीए झालेले तरुण परीक्षेला बसतात याहून दुर्दैवी गोष्ट कोणती, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेच्या वेळी अजित पवार यांनी केला. हा बेरोजगार तरुण उद्या गुन्हेगारीकडे वळू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ‘मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र’चे मोठे मोठे ढोल पिटले. जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च केले. नऊ लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रात आल्याचे सांगितले. हे उद्योग नेमके कुठे सुरू झाले आहेत आणि त्यात किती लोकांना रोजगार मिळाला ते आता तुम्हाला सांगावे लागेल. लोकांना फसविणारी जाहिरातबाजी करून तुम्ही सत्ता मिळवली खरी; परंतु करून काहीच दाखवले नाही अशी टीका केली.