कोणत्याही कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा अनादर केला जाऊ नये, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला. ते मुंबई मेट्रो-३ च्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड आणि हरियाणा राज्यांतील प्रकल्पांच्या उदघाटन सोहळ्यावेळी काँग्रेस मुख्यमंत्र्यांविरोधात उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करून गोंधळ घातला होता. त्यानंतर नागपूर येथे झालेल्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याच्या निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. त्यावर भाजपकडून जोरदार टीका झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत चव्हाणांची पाठराखण करत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याचा अनादर होऊ नये, याची जबाबदारी उपस्थितांनी घेणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले आणि अप्रत्यक्षरित्या भाजपला टोला हाणला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूही उपस्थित होते.