राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशीवरून नाहक चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असते. ही चौकशी एकदाची होऊन जाऊ दे म्हणजे साऱ्याच नेत्यांवरील संशय दूर होईल, असा पवित्रा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी घेतला.  आपल्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या विरोधातील चौकशी रोखण्यासाठी सरकारला पाठिंबा दिला हा आरोप चुकीचा आहे. चौकशांना सरकारने परवानगी द्यावी.  चौकशीत आम्ही निर्दोष आढळल्यास सरकारने तसे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.  अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी २६/११च्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पोलीस जिमखाना येथील शहिद स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मुंबईत सीसीटीव्ही लावण्यास विलंब लागल्याची खंत व्यक्त केली.