मुंबईच्या विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱयात सापडलेले मुंबई महापालिकेची आयुक्त सीताराम कुंटे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजय मेहता यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजय मेहता सोमवारीच पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
मुंबई महापालिकेकडून तयार करण्यात आलेला विकास आराखडा वादाच्या भोवऱयात सापडला होता. या आराखड्याची प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच राज्य सरकारने स्वतःच्या अधिकारात तो रद्द करून चार महिन्यांत नवा आराखडा तयार करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. विविध राजकीय पक्षांसह सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिकांनी या आराखड्यातील तरतुदींना जोरदार विरोध केला होता. आराखडा हरकती आणि सूचनांसाठी जाहीर करण्यात आल्यापासून त्यावर विविध आक्षेप नोंदविण्यात आले होते. राज्य सरकारने आराखडा रद्द केल्याने पालिका प्रशासन अडचणीत आले होते. सीताराम कुंटे यांनी या आराखड्याचे जोरदार समर्थन केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला.
पालिकेचे नवे आयुक्त अजय मेहता हे पर्यावरण विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली आता नवा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. सीताराम कुंटे यांची कुठे बदली करण्यात आली आहे, हे अद्याप समजलेले नाही.