सावरकर साहित्य संमेलनात एअर मार्शल भूषण गोखले यांचे मत

शांतता आणि संरक्षण सिद्धता या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय राष्ट्राची प्रगती होत नाही. भारताकडे या दोन्ही गोष्टी असल्याने देशाची प्रगती होत आहे. मात्र राजकारण आणि संरक्षण दलात समन्वय असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त)  भूषण गोखले यांनी शनिवारी २९व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात व्यक्त केले. भारताची संरक्षण सिद्धता विषयावर गडकरी रंगायतन येथे त्यांचे शनिवारी व्याख्यान झाले.

शांतता आणि संघर्ष हे रामायण-महाभारतापासून चालत आले आहे. संरक्षण सेना या शब्दापेक्षा सशस्त्र सेना हा शब्द समर्पक भासतो. संरक्षण या शब्दात कमकुवतपणा जाणवतो. राजकारण आणि संरक्षण दलात समन्वय साधला पाहिजे. संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजेत. यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्यावेळी तसे स्वातंत्र्य दिले होते. संरक्षण दलाला दिलेले स्वातंत्र्य सैन्याचे मनोबल वाढवणारे ठरते. आपल्या सैन्याचे नैतिक बळ वाढविण्यासाठी अशा प्रकारचे नेतृत्व असायला हवे, असे गोखले यांनी सांगितले. कारगिलच्या युद्धात वापरण्यात आलेली साधनसामग्री आपल्याला आयात करावी लागली होती. अशा प्रकारचे परावलंबित्व टाळण्यासाठी आपले तंत्रज्ञान विकसित करण्याभर भर दिला पाहिजे. हवाई दल, भूदल आणि नौदल यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, आपत्कालीन व्यवस्थापनेत तिन्ही दले तत्पर सेवा देतात, याची प्रचीती कारगिल युद्धात आली. आपल्याला कोणत्याही देशाच्या धमकीला घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाने सैनिकासारखे सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले.

कमांडर सुबोध पुरोहित यांनी नौदलाविषयी सांगताना विविध नौकाबोटींविषयी माहिती दिली. नौदल हे दोन देशांतील मैत्रिपूर्ण संबंध चांगले टिकवू शकतात, असेही ते म्हणाले. इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश, म्यानमार, थायलंड या पाच देशांशी आपले मैत्रिपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानचे नौदल हे आपल्यापेक्षा लहान आहे.

युद्धनौकांच्या बाबतीत सरस

सागरी मार्गाने पाकिस्तानसोबत आपली लढाई झाली तर आपण नक्की जिंकू. चीनचे नौदल हे आपल्यापेक्षा तिप्पट आहे. चीनने आक्रमण करायचे ठरवले तर त्यांना समुद्र मार्गाने आक्रमण करणे कठीण आहे. चीनकडून तसा धोका कमी असला तरी आपण गाफील राहून चालणार नाही. पाकिस्तानने सागरी मार्गाने हल्ला केल्यास आपण त्यांच्यापेक्षा युद्धनौकांच्या बाबतीत बलाढय़ आहोत, असे मत  कमांडर सुबोध पुरोहित यांनी व्यक्त केले.