संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नाही

आर्थिक आणि ‘बाहु’बळाच्या ताकदीवर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदरात पाडून घेऊन ‘मिरवून’ घेण्याच्या प्रवृत्तीला डोंबिवली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लगाम घातला गेला आहे. ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या ‘आगरी युथ फोरम’ने संमेलनाचे ‘स्वागताध्यक्ष’पद आपल्याकडेच ठेवल्याने या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणीही राजकीय व्यक्ती आता असणार नाही.

गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलन खर्चाची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली असून या संमेलनांवर राजकीय पक्ष किंवा त्यांच्याशी संबंधित संस्थांनी ‘कब्जा’ मिळविला आहे. साहित्य रसिकांसाठी तो चिंतेचा विषय ठरला होता. साहित्य संमेलनातून संपत्ती व ऐश्वर्याचे प्रदर्शन टाळावे, व्यक्तिगत आणि पक्षीय बडेजावासाठी संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी, उद्घाटन आणि समारोपप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तींची अकारण गर्दी असू नये, अशा स्पष्ट सूचना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने एका पत्राद्वारे आयोजक संस्थेला केल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर आगरी युथ फोरमने घेतलेल्या या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे डोंबिवली साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ कोणत्याही राजकीय नेत्याच्या गळ्यात न पडता ती संस्थेच्याच पदाधिकाऱ्याकडे ठेवून महामंडळाने केलेल्या सूचनांचे पालन किमान ‘स्वागताध्यक्ष’पदाच्या बाबतीत तरी आयोजक संस्थेने केले आहे.

स्वागताध्यक्ष म्हणून प्रसारमाध्यमातून आम्ही ज्यांची नावे ऐकली होती किंवा जी नावे चर्चेत होती त्या सर्वाबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र या पैकी कोणीही ‘आगरी युथ फोरम’पर्यंत आले नाहीत. गेली चार वर्षे साहित्य संमेलन डोंबिवलीत व्हावे म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. त्यामुळे आमच्या संस्थेकडेच हे पद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.    – गुलाब वझे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष