मद्यपान चाचणीत चार वर्षांत ६५० हवाई कर्मचारी अनुत्तीर्ण

ऐश्वर्यसंपन्न सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षेची १०० टक्के हमी देणाऱ्या विमानसेवेतील वैमानिकांमुळे कंपन्यांना मान ‘उंचावणे’ कठीण होऊन बसले आहे. कारण गेल्या चार वर्षांत तब्बल ६५० हून अधिक वैमानिकांसह हवाईसेवक मद्यपान चाचणीत नापास झाल्याचे समोर आले आहे. त्यातही गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०१५ या वर्षांत हे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.देशातील हवाई सुरक्षा नियामकानुसार वैमानिक व हवाईसेवकांना कामाची सर्व सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांना ‘श्वस चाचणी’ला सामोरे जाणे अनिवार्य आहे. त्यानुसार विमान कंपन्यांकडून वैमानिक व हवाईसेवकांची विमानात जाण्यापूर्वी दोनदा ‘श्वस चाचणी’ केली जाते. या चाचणीत उत्तीर्ण झाल्याशिवाय विमान सेवेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यास मज्जाव करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत या चाचणीत वैमानिकांसह हवाईसेवक नापास होत असल्याचे समोर येत असून हे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या आकडेवारीनुसार मद्यपान चाचणीत २०१३ या वर्षांत एकूण १६६, २०१४ साली १४४ तर २०१५ साली सर्वाधिक म्हणजेच १८६ वैमानिक आणि हवाईसेवक अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. देशातील हवाई यात्रेची धुरा सांभाळणाऱ्या वैमानिकांची मद्यपान चाचणीतील नापास होण्याची वाढती आकडेवारी पाहता, प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हवाई यात्रेतील मुख्य जबाबदारी वरिष्ठ कंमाडर आणि केबिन क्रू यांच्या खांद्यावर असते. मात्र नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या आकडेवारीत केबिन क्रू आणि वरिष्ठ कंमाडर यांचाही मद्य चाचणीत नापास होण्यामध्ये समावेश झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय होऊ शकते?

वैमानिक किंवा हवाईसेवक मद्यपान चाचणीत नापास झाल्याचे आढळल्यास त्याचा परवाना तीन वर्षांसाठी निलंबित होऊ शकतो किंवा असा प्रकार तिसऱ्यांदा झाल्यास परवाना कायमचा रद्द होऊ शकतो, असे जाणकार सांगतात.