मुंबईत किमान सहा हजार गणेश मंडप असून तेथे दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन मंडपात सतर्कता दाखवणाऱ्या नागरिकांना सोन्याची नाणी दिली जाणार आहेत व या सूचनेची माहिती देणारी पंचवीस हजार पोस्टर्सही मुंबईत सगळीकडे लागली आहेत.
संभाव्य दहशतवादी घटना घडू नयेत त्याची आधीच माहिती मिळावी यासाठी मुंबई पोलिसांनी आता बेवारस, संशयित वस्तू दाखवून दिल्यास नागरिकांना सोन्याचे नाणे बक्षीस देण्याचे जाहीर केले असून आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने ही योजना राबवली आहे. ‘मुंबई के लिये एक मिनिट’ असे या योजनेचे नाव असून आपल्या व्यस्त जीवनातील १ मिनिट लोकांनी सुरक्षेसाठी द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, बेवारस वाहन, संशयास्पद बॅगा, वस्तू किंवा गाडी दिसल्यास नागरिकांनी पोलिसांना सतर्क करावे, ही योजना आपण मंजूर केली असून एक-दोन दिवसात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. गणेश मंडपाचे प्रवेशद्वार, भक्तांच्या रांगा, पाìकग, पळण्याचे मार्ग येथे अशा बेवारस वस्तू ठेवल्या जाण्याची शक्यता असते त्यामुळे आम्ही जागरूक व सतर्क नागरिकांनी अशी काही बाब लक्षात आणून दिल्यास सोन्याचे नाणे देणार आहोत त्याचे मूल्य अजून ठरलेले नाही पण त्याबाबत माहिती देणारी २५ हजार पोस्टर्स लावली आहेत तसेच चित्रपटगृहातही त्याची जाहिरात केली जात आहे असे पोलीस उपायुक्त  धनंजय कमलाकर यांनी सांगितले. पोलिसांची सतर्कता तपासली जाते तसाच हा प्रकार असून यात नागरिकांना सतर्कता शिकवणे हा उद्देश आहे. गणेशमंडपांनी सीसीटीव्ही लावावेत व खासगी सुरक्षा रक्षक ठेवावेत असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. धातुशोधक यंत्रे वापरणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आले. एकूण ६ हजार गणेशमंडप असून लाखो घरांमध्येही गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीला केली जाते. सणासुदीच्या काळात दहशतवादी कारवायांची शक्यता असते त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा योजना तयार केली आहे. मुंबईत एकूण ४२ हजार  पोलीस असले तरी नागरिकांची सतर्कताही गरजेची आहे. बॉम्बनाशक पथक, जलद कारवाई दल, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान अगोदरच तनात करण्यात आले आहेत.