खोल समुद्रात मनसोक्त विहार करणारे डॉल्फिन मासे रायगड जिल्ह्य़ातील नागोठणे येथील आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
नागोठणे शहरालगत वाहणाऱ्या अंबा नदीत सकाळी ११च्या सुमारास एक डॉल्फिन जलविहार करताना आढळून आला. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि माशाच्या दर्शनासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. खाऱ्या पाण्यातील हा मासा चक्क गोडय़ा पाण्यात आल्याने डॉल्फिन मासा हा सर्वासाठी चच्रेचा विषय बनला.
खोल समुद्रात आढळणारा हा डॉल्फिन मासा भरकटल्यामुळे धरमतर खाडीतून अंबा नदीत आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. मग काय, डॉल्फिनच्या बचावासाठी वन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, पोलिसांचे पथक दाखल झाले आणि पुन्हा एकदा सुरू झाली माशाच्या बचावाची मोहीम.
काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्य़ातील रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू व्हेल प्रजातीचा ४२ फूट लांबीचा महाकाय मासा जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आला होता. या माशाला पुन्हा एकदा समुद्रात लोटण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र या बचाव मोहिमेदरम्यान ब्ल्यू व्हेल माशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आता पुन्हा एकदा रायगड हद्दीत चक्क नदीपात्रात सुमारे साडे चार फूट लांबीचा हा पूर्ण वाढ झालेला डॉल्फिन आढळून आल्याने, जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली.
कुठल्याही परिस्थितीत डॉल्फिन माशाला सुखरूप समुद्रात सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र डॉल्फिनला पकडायचे तरी कसे आणि का, हा कळीचा मुद्दा होता. रात्री उशिरापर्यंत माशाला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते.