सतत चर्चेत राहणारे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी सांताक्रूझमध्ये फेरीवाल्यांविरोधात आघाडी उघडली आणि नेमक्या याच कारवाईच्या वेळी फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याने ढोबळेंची गृहखात्याने बदली केली. मात्र या बदलीनंतर मुंबईत पोलिसांनी फेरीवाला हटाव मोहीम’ जोर लावून सुरू केली आहे.
जे ढोबळे यांना जमू शकते ते इतर अधिकाऱ्यांना का जमू शकत नाही, अशी चर्चा मुंबईत गेले काही दिवस सुरू होती. ढोबळेंच्या बदलीनंतर तर या चर्चेला ऊत झाला. ढोबळे गेल्याने आता कारवाई थंडावणार अशीच भीती निर्माण झाली होती. परंतु ढोबळेंची बदली झाली तरी कारवाईत फरक पडलेला नाही, हे दाखवून देण्यासाठी वाकोला-सांताक्रूझ विभागात कारवाई चालू ठेवली गेली. ढोबळे नसले तरी कारवाई होऊ शकते, हे या निमित्ताने दाखवून देण्यात पोलीस यशस्वी ठरले.
परंतु त्याचवेळी फक्त पश्चिम उपनगरातच का? असा सवाल करीत उर्वरित मुंबईतही अशी ‘ढोबळे’गिरी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग तसेच कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त सदानंद दाते यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्तांची बैठक घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम दीड महिन्यांपासून सुरू केली होती. या संदर्भात नांगरे-पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वीच सुमारे ७७ ठिकाणे निश्चित करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठांवर जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार कारवाई सुरू झाली होती. ही यादी मिळाल्यानंतर वाकोला विभागाचे सहायक आयुक्त असलेल्या ढोबळे यांनी आपल्या पद्धतीने ही कारवाई सुरू केली होती. त्या तुलनेत इतर पोलीस ठाण्यांतून धडक कारवाई होत नव्हती. पोलीस बंदोबस्तात पालिकेने कारवाई केल्यानंतर रस्ते वा पदपथ मोकळे होतात. परंतु संध्याकाळी पुन्हा फेरीवाले येऊन बसतात. ही बाब रहिवाशांनी निदर्शनास आणल्यानंतर नांगरेपाटील यांनी विशेष पथकाची स्थापना करीत पालिका कर्मचाऱ्यांना सायंकाळी बसणाऱ्या फेरीवाल्यांविरुद्धही कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे गेले अनेक वर्षे मोकळे होऊ न शकलेले अनेक परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त होऊन मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला.
नांगरे-पाटील यांच्या कारवाईचा दणका पाहताच इतर अतिरिक्त आयुक्तांनीही आपापल्या परिसरात अशी कारवाई सुरू केली आहे. चेंबूर, गोवंडी, कुर्ला आदी परिसरातील फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असली तरी ते पुन्हा तेथे बसत असल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त आयुक्त खलिद कैसर यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना त्याबाबत बजावले असले तरी प्रत्यक्षात कारवाई धीम्या गतीने होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.