राष्ट्रवादीने आपल्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला असून, काही विद्यमान मंत्र्यांना नारळ देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यातूनच काही मंत्र्यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे.
अजित पवार यांच्या फेरप्रवेशानंतर राष्ट्रवादीने मंत्र्यांना बदलण्यावर भर दिला आहे. विद्यमान काही मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यातूनच पक्षाच्या तीन ते चार मंत्र्यांना राजीनामा देण्याच्या सूचना पक्षाच्या नेतृत्वाने दोन दिवसांपूर्वी केल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले. राजीनामा देण्यासाठी निरोप येऊ लागल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे. आपला क्रमांक लागणार नाही ना, याची मंत्र्यांना भीती आहे. राजीनामां पत्र पक्षाकडेच ठेवण्यात येणार असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी ते सादर केले जातील. निरोप आलेल्या एका मंत्र्यांने अन्य मंत्र्यांकडे राजीनाम्याबाबत विचारणा केल्याचेही समजते.  
नव्या रचनेत राज्यमंत्री सचिन अहिर यांना कॅबिनटे दर्जाचे मंत्री म्हणून बढती दिली जाणार आहे. शशिकांत शिंदे यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याही नावाची चर्चा आहे . मराठवाडय़ातील प्रतिनिधीत्व वाढवले जाऊ शकते. पक्षाच्या एका बडय़ा मंत्र्याला वगळले अथवा त्याचे खाते काढून घेतले जाऊ शकते, असे पक्षाच्या एका बडय़ा नेत्याने सांगितले.
मुख्यमंत्रीही प्रयत्नशील
राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित करण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या वेळी होणाऱ्या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या तीन रिक्त जागा भरण्याबरोबरच काही विद्यमान मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. विस्ताराकरिता परवानगी मिळाल्यास मुख्यमंत्र्यांचे आसन पक्के असल्याचा संदेश जाईल.
राज्यसभेसाठी पुन्हा उपराच ?    
राज्यसभेच्या एका जागेसाठी बाहेरच्या राज्यातील नेत्याला महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची योजना आहे. मात्र, यापूर्वी राजीव शुक्ला यांना दोनदा संधी देण्यात आली. पुन्हा बाहेरच्या राज्यातील नेत्यासाठी महाराष्ट्राचा आधार घेऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचे समजते.