काँग्रेसचे ६१-४० चे सूत्र; तर राष्ट्रवादी ५६-४१ साठी आग्रही
राष्ट्रवादीने निम्म्या जागांचा आग्रह सोडल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीचा मार्ग शनिवारी मोकळा झाला असला तरी कोणी किती जागा लढवायच्या याचा तिढा सुटू शकला नव्हता. चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने मांडला आहे.
महापालिकेच्या एकूण १२२ पैकी २१ प्रभागांमध्ये संघर्ष समितीच्या विनंतीवरून बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. १०१ पैकी काँग्रेस ६१ तर राष्ट्रवादीने ४० जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसने मांडला होता. चार प्रभागांवर उभय बाजूने दावा करण्यात आला आहे. यामुळेच काँग्रेसने ५६ तर राष्ट्रवादीने ४१ जागा लढवाव्या व चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. आघाडीबाबत आम्ही अनुकूल आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने चार ते पाच प्रभागांवर दावा सांगितल्याने एकमत झाले नव्हते. यावर पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने ५२ उमेदवारांच्या पहिली यादी जाहीर केली. कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. यामुळेच जास्त जागांची मागणी राष्ट्रवादीने सोडून द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.