भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिंचा कलश आपल्याकडे असल्याचा दावा करून तो निवासस्थानी दर्शनासाठी ठेवणाऱ्या मनसे आमदार राम कदम यांच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आणि कदम यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रविवारी जोरदार धुमश्चक्री उडाली, तर जनतेची दिशाभूल करणाऱ्या कदम यांना अटक करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी श्रीलंकेतून आणण्यात आल्या असून, त्या दर्शनासाठी मनसे आमदार राम कदम यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्या आहेत, अशा आशयाचे फलक विक्रोळी परिसरात लावण्यात आले होते. त्याविरोधात भारिप बहुजन संघाचे कार्यकर्त्यांनी पार्कसाइट पोलिसांत कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. अशा अस्थी या राष्ट्रीय संपत्ती असून त्या कुणाच्या निवासस्थानी नेता येत नाही. हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशी तक्रार भारिप बहुजन महासंघाचे उपाध्यक्ष साहेबराव तायडे यांनी केली. या वेळी राम कदम यांनी या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. त्या वेळी झालेल्या वादातून कदम यांच्या कार्यकर्त्यांनी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे तायडे यांनी सांगितले. या मारहाणीमुळे आमचे तीन कार्यकर्ते रुग्णालयात दाखल असल्याची माहितीही त्यांनी दिली. पार्कसाइट पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सकपाळ यांनी सांगितले. अस्थी या बौद्ध भिख्खूंनी आणल्या होत्या, असेही ते म्हणाले.