बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सभाही?
इंदू मिलच्या जागेतील बहुचर्चित आंबेडकर स्मारकाचे भूमीपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून त्यासाठी अखेर ४ ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागासवर्गीय आरक्षणाच्या विरोधात मांडलेल्या मतांच्या पाश्र्वभूमीवर उमटलेले पडसाद बिहार निवडणुकीपूर्वी शांत करण्यासाठी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा घेण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. स्मारकाचा आराखडा निश्चित करण्यात येत असून त्यात ग्रंथालय आणि संशोधन केंद्र मात्र उभारले जाणार नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेचा वाद मिटविण्यात अनेक वर्षे गेल्यावर आता भूमीपूजन करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनीही त्यास दुजोरा दिला. धम्म चक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबरला असून त्यापूर्वी भूमीपूजनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्याचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सरसंघचालकांच्या वक्तव्यांवरुन देशभरात पडसाद उमटले असून बिहार निवडणुकीत भाजपला त्याचा त्रास होण्याची चिन्हे आहेत. त्या पाश्र्वभूमीवर डॉ. आंबेडकरांच्या भव्यदिव्य स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले तर त्याचा विशेषत मागासवर्गीय समाजात चांगला संदेश जाईल. त्यादृष्टीने मोदी यांच्या सभेचेही आयोजन करण्याचेही नियोजन आहे. मात्र सध्या मुंबईत पाऊस होत असल्याने ही सभा कोठे घ्यावी, यावर विचारविनिमय सुरु आहे.
इंदू मिलच्या जागेच्या किंमतीवरुन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाशी (एनटीसी) राज्य सरकारचा वाद असून तेवढय़ा रकमेचे विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) दिले जाणार आहेत. राज्य सरकारकडे निधीची चणचण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा वाद मिटण्याआधीच भूमीपूजन करण्यात येणार आहे.
स्मारकासाठी शशी प्रभू यांची संकल्पना
सुप्रसिध्द वास्तू विशारद शशी प्रभू यांनी स्मारकाचे केलेले संकल्पचित्र किंवा आराखडा मान्य करण्यात आला आहे. या जागेतील तलावाचे सुशोभीकरण केले जाणार असून स्तुपाच्या आकारातील हे स्मारक भव्यदिव्य करण्यात येणार आहे. मात्र या जागेत ग्रंथालय किंवा संशोधन केंद्र उभारण्याची मागणी होती. पण सध्या तरी तसे नियोजन नाही. स्मारकासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून स्मारकाच्या उभारणीसाठी चार-पाच वर्षे लागतील.
’संघाच्या आरक्षणविरोधी भूमिकेमुळेच इंदू मिलच्या भूमिपूजनाची घाई’
मुंबई: आरक्षणाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेले मत व त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत परिणाम होऊ शकतो याची भीती भाजपला असल्यानेच घाईघाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केला. राजद्रोहाबद्दल काढण्यात आलेल्या परिपत्रकावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले. यावरून सरकारने काढलेले हे परिपत्रक चुकीचे होते हे सिद्ध होते, असेही चव्हाण म्हणाले. सतानत संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करताना आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात बंदीचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. नंतर हा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्यास त्याची माहिती नाही.