मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत होणार निर्णय

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलच्या Indu Mill जमिनीचा ताबा राज्य सरकारकडे मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात उद्या होणाऱ्या बैठकीत जमीन हस्तांतरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांपूर्वी केंद्रातील व राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण म्हणजे साडेबारा एकर जमीन देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्या जमीनीवरील उद्योगाचे आरक्षण उठविण्यापलीकडे सरकारने पुढे फार काही कार्यवाही केली नाही. त्यानंतर राज्यात व केंद्रातही सत्तांतर झाले. केंद्रातील भाजप सरकारने ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमीपूजनही केले. परंतु राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून (एनटीसी) ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात मिळण्याचा प्रश्न तसाच भिजत पडला.

दरम्यान, राज्यातील युती सरकारने इंदू मिलची संपूर्ण जमीन आंबेडकर स्मारकासाठी आरक्षित करण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली. मात्र जमीन ताब्यात नसल्याने स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरु करता येत नाही. आता हा प्रश्नही मार्गी लागणार आहे. उद्या स्मृती इराणी मुंबईत येणार आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री आठवलेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.