पुनर्बाधणीसाठी श्रमदानाच्या नावनोंदणीला सुरुवात

उच्च न्यायालयाने स्थगिती देऊनही दादरमधील आंबेडकर भवन व बुद्ध भूषण प्रिंटींग प्रेस उध्वस्त केलेल्या जागेवर श्रमदानातून पुर्नबांधणी करण्यासाठी राज्यभरातून मोठय़ा संख्येने आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते शनिवारी जमा झाले होते. यावेळी ४ ते ५ हजार कार्यकर्त्यांनी आंबेडकर भवन उभारणीकरिता श्रमदान करण्याकरिता आपले नाव नोंदविले. तसेच, पुनर्बाधणीकरिता आर्थिक निधीही देऊ केला.

‘आंबेडकर भवन झालंच पाहिजे’, ‘भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत आंबेडकरी जनतेने आंबेडकर भवनाला घेराव घातला. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कार्यकर्ते आंबेडकर भवनापर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तसेच आंबेडकर भवन आणि आंबेडकरांच्या विचारांशिवाय आपल्याला पर्याय नाही, अशा अर्थाची पत्रकेही परिसरात वाटली जात होती.

आंबेडकर भवनाच्या इमारतीची श्रमदानातून पुनर्बाधणी करणाच्या प्रकाश आंबेडकरच्या प्रयत्नाला शुक्रवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तरिही श्रमदानातून आंबेडकर भवन पूर्ववत करण्याकरिता हजारो आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. यात भारीप बहुजन महासंघ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल सलाम पक्ष व श्रमिक मुक्ती दल या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. वातावरण तापल्यामुळे महासंघाचे जेष्ठ नेते जी. वी. पवार यांनी जमलेल्या जमावाला शांत राहण्यास सांगितले. तसेच  संविधानाचा आदर राखून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी चार ते पाच हजार कार्यकर्त्यांंनी दादरच्या श्रमिक दलाच्या कार्यालयात जाऊन पुनर्वसनासाठी नावनोंदणी केली. न्यायालयाची पुढील सुनावणी होईपर्यंत ही नावनोंदणी सुरु राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

पूनर्वसनाचे हे आंदोलन थांबले नसून यापुढेही चालूच राहील. तसेच सर्वपक्षाची तातडीची बठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सोमवारी न्यायालय आंबेडकर भवनाचा निर्णय देणार असल्याचे आम्ही त्याची पाहत आहोत आहोत. आमच्या हातून न्यायालयाचा अवमान होईल असे कृत्य होणार नाही.

ज. वि. पवार, नेते भारीप बहुजन महासंघ