भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी वेगवेगळे मोर्चे काढून जातीय अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्माध आणि जातीयवादी व्यवस्था खिळखिळी होईपर्यंत चिकाटीने लढा देण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आंबेडकर यांनी आंबेडकरी जनता व डाव्या-पुरोगामी संघटनांना केले. तर, दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रसंगी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरेल, असे इशारा आठवले यांनी दिला.
पोलिसांना जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांडातील आरोपी अजून सापडत नाहीत, उलट त्या पीडित कुटुंबाचाच छळ चालविल्याबद्दल दलित समाजात प्रचंड असंतोष आहे. प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दोन वेगवेगळ्या मोर्चातून सरकारविरुद्धचा राग दिसला. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मोर्चात शेकाप, माकप, जनता दल, लाल निशान पक्ष, रिपब्लिकन पक्ष (गवई गट), श्रमिक मुक्ती दल, राष्ट्रीय दलित पँथर, इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.
आझाद मैदानकडे कूच करणाऱ्या मोर्चाला पोलिसानी भायखळा पुलाजवळ अडवले. रस्त्यावर निळ्या-लाल झेंडय़ांचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. जिजामाता उद्यानात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. जातीअंतासाठी लढणाऱ्यांवर दहशत बसविण्यासाठी जवखेडय़ासारखे हत्याकांड घडविले जाते, तर डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा खून करुन अंधश्रद्धेविरुद्ध चळवळ करणाऱ्यांना धडा शिकवू हा, धर्माध शक्तीने दिलेला इशारा आहे. या दोन्ही शक्तीविरुद्ध लढण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. या वेळी प्रा. एस.एस.जाधव, ज.वि.पवार, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, प्रभाकर नारकर, किशोर ढमाले, नाना भालेराव, कपिल पाटील, सुनील खांबे, विजय कुलकर्णी, डॉ. अशोक ढवळे, मिलींद रानडे, आदींची भाषणे झाली.
जवखेडा दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करा, या मागणीसाठी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमी ते इंदू मिल असा रिपब्लिकन पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातही मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दलितांवरील अत्याचार थांबले नाहीत तर, रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा आठवले यांनी दिला. या वेळी अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, सुमंतराव गायकवाड, भूपेश थुलकर, गौतम भालेराव आदींची भाषणे झाली.
सीबीआय चौकशीचे तावडेंचे आश्वासन
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे आठवले यांच्या मोर्चाला सामोरे गेले. जवखेडा हत्याकांडातील आरोपी पकडण्यास पोलिसांना अपयश येत असेल तर हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची सरकारची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. तर पुढील वर्षी १४ एप्रिल रोजी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.