‘मिस्टर परफेक्शनिस्ट’, ‘मॅरेथॉन मॅन’, ‘मार्केटिंग तज्ज्ञ’, ‘मिस्टर बॉक्स ऑफिस’ अशी कितीतरी विशेषणे आमिर खानला चिकटली आहेत. तो एक कलाकार आहे, त्याचबरोबर एक चळवळीतला कार्यकर्ता, विचारी नेता आणि मुख्य म्हणजे सामाजिक जाणिवांचे भान असलेला कलाकार म्हणूनही त्याची ख्याती आहे. असा अष्टपैलू कलाकार ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या खास कार्यक्रमात पाहूणा म्हणून येणार आहे.
गप्पांमधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अंतरंग उलगडून दाखवणारा ‘एक्स्प्रेस अड्डा’ हा कार्यक्रम गेले वर्षभर दिल्ली आणि मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. याच कार्यक्रमांतर्गत बुधवारची संध्याकाळ वांद्रे येथील ऑलिव्ह बार अँड किचनमध्ये आमिरच्या मनमोकळ्या गप्पांनी खुलणार आहे. हे वर्ष अभिनेता म्हणून आमिरसाठी फार यशस्वी ठरले आहे. ‘तलाश’ला मिळालेले यश, सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘सत्यमेव जयते’सारख्या सामाजिक शोला मिळालेला लोकांचा प्रतिसाद या सगळ्यामुळे आमिरची एक वेगळीच प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. चांगल्या विषयावरील एखाद्या चित्रपटाला निर्माता-दिग्दर्शक मिळत नसेल तर असा वेगळा चित्रपट करण्याचे धाडस फक्त आमिर खानकडे आहे, असा त्याचा लौकिक आज बॉलिवूडमध्ये आहे. आमिरच्या गप्पा ऐकण्याची संधी निवडक मुंबईकरांना ‘एक्स्प्रेस अड्डा’च्या निमित्ताने मिळणार आहे.