एमबीए झाल्यावर मुंबईत नोकरीसाठी आलेल्या अमित नायक या तरुणाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी आणि प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे असे वाटले आणि त्याने त्यानुसार अभ्यासास सुरुवात केली. पण नियतीची इच्छा काही वेगळीच होती. मागच्या वर्षी पूर्व परीक्षा दिल्यावर त्याला गंभीर आजाराने ग्रासले. यातून तो सुखरूप बाहेर पडला आणि २०१४मध्ये घेण्यात आलेली पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत देऊन त्याने संपूर्ण देशात ३७७ व्या क्रमांक पटकाविला.
मुळचा बेंगळुरू येथील अमितचे शालेय शिक्षण तसेच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण बेंगळुरूमध्ये पार पडले. यानंतर त्याने एमबीए केले व तो मुंबईत नोकरीसाठी आला. येथे नोकरी करताना त्याला प्रशासकीय सेवेत करिअर करावे असे वाटले आणि त्याने त्यानुसार तयारीही सुरू केली. त्याने एका प्रशिक्षण संस्थेत आपले नावही घातले. अभ्यास करून त्याने दीड वर्षांपूर्वी झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपले नाव नोंदविले. तयारी करून पूर्व परीक्षाही दिली. त्याच वेळेस त्याच्या गळय़ाला मोठी गाठ आल्याचे निदर्शनास आले. मग तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली.
पण या सर्वातून मागे न हटता त्याने मुख्य परीक्षाही दिली. पण त्यात यश आले नाही. आजारपणाचा त्रास त्याला होतच होता. अशाचवेळी त्याने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली. मग २०१४मध्ये घेण्यात आलेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीबरोबरच प्राथमिक वैद्यकीय चाचणीतही तो पात्र ठरला आणि देशभरातील क्रमवारीत ३७७ वा आला. त्याच्या या प्रवासात कुटुंबीय आणि मार्गदर्शकांचा वाटा असल्याचे तो आवर्जून सांगतो.