दिल्लीत अनेक मुद्दय़ांवर उफाळलेले पक्षांतर्गत वाद आणि महाराष्ट्रात गैरव्यवहार व अन्य आरोपांच्या घेऱ्यात सापडलेले मंत्री यांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता माजलेली असताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी परिसरात वृक्षारोपण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निवडक भाजप नेत्यांच्या बैठकीपाठोपाठ शहा यांनी कोणताच कार्यक्रम नसताना प्रबोधिनीस भेट दिल्यामुळे पक्षात नेमके काय चालले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेले काही दिवस भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी काही वक्तव्ये केली. लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा यांनी नेतृत्वाकडे रोख स्पष्ट करणारे खडे बोल सुनावले. केंद्रातील व महाराष्ट्रातील अनेक मंत्रीही वेगवेगळ्या आरोपांमुळे अडचणीत आले. त्यातूनच राज्यातील भाजपमध्ये पक्षांतर्गत संघर्षही चव्हाटय़ावर आला आणि संघटनात्मक पातळीवर सारे काही आलबेल नाही, हे उघड झाले आहे.
या गदारोळात शहा यांनी म्हाळगी प्रबोधिनीस भेट दिली. मात्र भेटीदरम्यान प्रबोधिनीमध्ये सुरू असलेल्या एका बैठकीस हजेरी लावून त्यांनी मार्गदर्शन केले. या दौऱ्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी
दिली.