सुजॉय घोषची निर्मिती असलेल्या ‘टीई३एन’ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा कोलकात्यात चित्रीकरणात रमले आहेत. मात्र चित्रीकरणादरम्यान त्यांच्या बरगडय़ांना दुखापत झाल्याने या आनंदाला वेदनेचे गालबोट लागले आहे. बरगडय़ांना दुखापत झाली असल्याने श्वास घेताना थोडासा त्रास जाणवतो आहे, मात्र काळजी करण्याचे कारण नाही, असे आपल्या चाहत्यांना सांगून अमिताभ बच्चन यांनी पुन्हा जोमाने चित्रीकरणही सुरू केले असल्याचे सेटवरच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी शूजित सिरकार दिग्दर्शित ‘पीकू’ या चित्रपटामुळे बच्चन कोलकात्यात होते. त्या वेळीच कोलकाता शहराच्या प्रेमात पडलेल्या अमिताभ बच्चन यांना या वर्षी पुन्हा एकदा तिथेच चित्रीकरण करण्याची संधी निर्माता म्हणून सुजॉय घोषने दिली आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘टीई३एन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना बरगडय़ांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे श्वास घेताना छातीत वेदना होतात, पण यात काळजी करण्यासारखे काही नाही, असा दिलासा खुद्द बच्चन यांनी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना दिला.

सध्या वेदनाशामक गोळ्या सुरू असून गरज पडल्यास अन्य चाचण्या करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले आहे.