ताकदीची अभिनेत्री, मनस्वी लेखिका आणि गायिका अशा हरहुन्नरी अमृता सुभाषशी मुक्त संवादाचा कार्यक्रम आज, गुरुवारी दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात रंगणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात धडाडीने काम करून स्वतचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांशी संवाद साधून त्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने ‘व्हिवा लाउंज’ हा उपक्रम सुरू केला. केसरी प्रस्तुत आणि दिशा डायरेक्टच्या सहकार्याने होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
श्वास, देवराई, नितळ, अस्तु, वळू आणि आता किल्ला अशा एकापेक्षा एक सरस आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांतून भूमिका करत अमृता सुभाषने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले तसेच समीक्षकांचीही पसंती मिळवली. ‘अस्तु’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नाटय़प्रशिक्षण संस्थेत पं. सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या अमृताने साकारलेली ‘ती फुलराणी’मधील मंजू आजही रसिकांच्या लक्षात आहे. त्याशिवाय ‘अवघाचि संसार’, ‘झोका’, ‘पाऊलखुणा’ मालिकांमधील तिच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या आहेत. अमृताने आतापर्यंत आव्हानात्मक भूमिकांचे सोने केले आहे.
* कधी : आज, २७ ऑगस्ट
* वेळ : संध्याकाळी ४.४५ वाजता
* कुठे : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.)
* प्रवेश विनामूल्य (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)